Tuesday, January 18, 2011

चांदण

दिवाळी आधीच्या रविवारी मी, रुणु आणि संजू खरेदीला गेलो होतो. 

दिवाळीसाठी नवीन कपडे, भेटवस्तू, पडदे, बेडशिटस, उश्यांचे अभ्रे... झालंच तर थोडी भाजी, फळे, फराळासाठी लागणारे खास जिन्नस, काही मिठाई, सुकामेव्याचे बॉक्स .... वगैरे वगैरे सगळे आठवून आठवून घेवून झाले. 

शेवटी हाश-हुश करत मी जाहीर केले कि आता घरी जावून मी काही बनवणार नाही ... आपण बाहेरच जेवूयात. मंडळींनी मान डोलावली. 

आम्ही आमच्या ठरलेल्या हॉटेल पाशी आलो ... तिथे हि गर्दी..... आता इतके समान घेवून उभे तरी किती वेळ राहायचे .. शेवटी सर्वानुमते ठरले कि पार्सल घेवून घरी जावू आणि जेवू. 

पार्सल त्यातल्या त्यात लवकर मिळाले. आम्ही बाहेर पडलो. संजू गाडी काढायला पार्किंग कडे वळला. 

बाहेर एक साधारण २७-२८ ची तरुणी .. बरोबर दोन छोटी कच्ची-बच्ची..... एक कडेवर .. एक हाताशी... डोळ्यात अजीजी.. लाज ... अगतिकता ... भूक ...सर्वकाही. तिने हाताशी असलेल्या मुलीला ढोसले आणि खुणावले... ती हि पोट्टी धावत धावत गेली आणि संजूच्या हाताशी बिलगली.. मी श्वास रोखलेला.. काय होतंय काय नाही.... 

संजूने शांतपणे पाकीट उघडले आणि ५० ची नोट तिच्या हातात ठेवली. मी अचंबित. 

पोट्टीचा चेहरा असा खुलला कि बास ... ती पळत पळत आईकडे आली .. आई माझ्याजवळच उभी होती.. पोट्टी म्हणाली... मम्मी, आज भात करता येईल ना रात्री जेवायला ? आईची नजर माझ्याकडे वळली आणि मी तिच्या डोळ्यात खरंखुर चांदण पाहिलं. 

जे माझी संपूर्ण खरेदी नाही देवू शकली ते सुख मला  ५० ची नोट देवून गेली ..... आमची दिवाळी साजरी झाली.
   

2 comments: