Monday, December 26, 2011

कभी खुद को ज्यादा स्मार्ट नही समझना चाहिये...............

कल्पेश खर्व ... एक स्पर्धक ... X Factor - India चा.
तो आला. एकदम सी ग्रेड हिंदी सिनेमात टपोरी गुंड असतात ना तसा लुक. तशीच थोडीशी हट्टीकट्टी देहयष्टी... तशीच दाढीची खुंट... थोडेसे किडलेले वाटणारे दात ... डोक्यावर तिरकी कॅप... pant च्या ऐवजी काहीतरी धोती type किंवा पतियाला type .. ते हि गुलाबी शेड वर ... शर्ट मात्र मळकट रंगाचे... गळ्यात स्कार्फ किंवा पटका किंवा स्टोल .. असाच काहीतरी...
मनात आला.. हा गाणार? हाच प्रश्न सोनू निगम, श्रेया घोषाल आणि संजय भन्साळी च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता...
त्यात या पट्ठ्याने आल्या आल्याच सांगून टाकले.. .मला काही गाणे येत नाही फारसे... नुकताच शिकू लागलो आहे.. इथे फक्त सोनू ला बघायला मिळावं म्ह्नणून आलोय...
झालं .... उरली सुरली अपेक्षा हि संपली...
सोनुनी विचारला ...तुझा आदर्श कोण? .. तर हा म्हणे ... तुम्ही... ( कदाचित सोनू मनात म्हणाला असेल .. मक्खन ... ह्म्म्म ) सांगितला त्याला गाणं सुरु करायला....
आणि केवळ पुढच्या दोन मिनिटांसाठी तो आणि तोच उरला.... काय गायला पट्ठ्या........ अप्रतिम........सुरेख........ सुरेल........ अविश्वसनीय ....... झक्कास ...
दोन मिनिटांनी थांबला आणि तीनही परीक्षकांकडे शब्दच उरले नाहीत...
सोनू ची कमाल वाटली... त्याचे प्रामाणिक शब्द होते... "कल्पेश, आज तुमने मुझे इक चीज फिरसे सिखा दी .... कभी खुद को ज्यादा स्मार्ट नही समझना चाहिये... मुझे बिलकुल उम्मीद नही थी के तू गा भी पायेगा ......"

Tuesday, January 18, 2011

चांदण

दिवाळी आधीच्या रविवारी मी, रुणु आणि संजू खरेदीला गेलो होतो. 

दिवाळीसाठी नवीन कपडे, भेटवस्तू, पडदे, बेडशिटस, उश्यांचे अभ्रे... झालंच तर थोडी भाजी, फळे, फराळासाठी लागणारे खास जिन्नस, काही मिठाई, सुकामेव्याचे बॉक्स .... वगैरे वगैरे सगळे आठवून आठवून घेवून झाले. 

शेवटी हाश-हुश करत मी जाहीर केले कि आता घरी जावून मी काही बनवणार नाही ... आपण बाहेरच जेवूयात. मंडळींनी मान डोलावली. 

आम्ही आमच्या ठरलेल्या हॉटेल पाशी आलो ... तिथे हि गर्दी..... आता इतके समान घेवून उभे तरी किती वेळ राहायचे .. शेवटी सर्वानुमते ठरले कि पार्सल घेवून घरी जावू आणि जेवू. 

पार्सल त्यातल्या त्यात लवकर मिळाले. आम्ही बाहेर पडलो. संजू गाडी काढायला पार्किंग कडे वळला. 

बाहेर एक साधारण २७-२८ ची तरुणी .. बरोबर दोन छोटी कच्ची-बच्ची..... एक कडेवर .. एक हाताशी... डोळ्यात अजीजी.. लाज ... अगतिकता ... भूक ...सर्वकाही. तिने हाताशी असलेल्या मुलीला ढोसले आणि खुणावले... ती हि पोट्टी धावत धावत गेली आणि संजूच्या हाताशी बिलगली.. मी श्वास रोखलेला.. काय होतंय काय नाही.... 

संजूने शांतपणे पाकीट उघडले आणि ५० ची नोट तिच्या हातात ठेवली. मी अचंबित. 

पोट्टीचा चेहरा असा खुलला कि बास ... ती पळत पळत आईकडे आली .. आई माझ्याजवळच उभी होती.. पोट्टी म्हणाली... मम्मी, आज भात करता येईल ना रात्री जेवायला ? आईची नजर माझ्याकडे वळली आणि मी तिच्या डोळ्यात खरंखुर चांदण पाहिलं. 

जे माझी संपूर्ण खरेदी नाही देवू शकली ते सुख मला  ५० ची नोट देवून गेली ..... आमची दिवाळी साजरी झाली.
   

Monday, January 17, 2011

खरंच निबंध चुकला?

रुणु तेव्हा दुसरीत होती. नेहमी तिचे पैकीच्या पैकी मार्क पहायची सवय झालेली मला. सहामाहीचा निकाल हातात आला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. इंग्लिश मध्ये एकदम आठ मार्क कमी!! 


झाले .. माझ्यातली कडक आई जागी झाली. वेगवेगळे प्रश्न विचारून मी त्या सात वर्षाच्या चिमुरडीला भंडावून सोडले. बिच्चारी .. तिला मला काहीही सांगता येत नव्हते. तिचे एकच उत्तर... मी सगळे बरोबर लिहिले आहे.. मला नाही माहिती काय झाले ते. शेवटी मी म्हटले पाहू या ओपन डे ला. पेपर पाहायला मिळतीलच ना. मग समजेल नक्की कशावर काम करायला हवे आहे ते. 


मी पुढचा पूर्ण प्लान हि तयार केलेला. कसा अभ्यास घ्यायचा.. किती वेळ खेळायला सोडायचे.. किती वेळ TV पाहून द्यायचा. चांगली शिस्त लावली पाहिजे. रोज भरपूर लिखाण करून घेतले पाहिजे. पुस्तके आणली पाहिजेत अवांतर अभ्यासासाठी. मी पूर्ण विसरले होते कि माझे पिल्लू फक्त सात वर्षाचे आहे. 

पाहता पाहता ओपन डे आला. मी शाळेत पोहोचले. पेपर हातात घेतला. पहिल्या पानावर सगळे बरोबर...... दुसऱ्या पानावर सगळे बरोबर...... तिसऱ्या  पानावरही तसेच. पानागणिक माझा आवेश कमी आणि उत्सुकता वाढू लागली. 

शेवटच्या पानावर..  निबंधात दहा पैकी दोन मार्क....  का?.... निबंध तर सुरेख लिहिलेला. पूर्ण दहा ओळि. मग काय चुकले ? मनातले प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेवून मी तिच्या टीचर कडे पहिले... आणि कसनुसे हसून त्या म्हणाल्या .... तो निबंध सुरेख आहे पण विषयाला धरून नाहीये म्हणून मार्क काटले. 

निबंधाचा विषय होता "My Favorite Family Member".. आणि रुणुनी लिहिले होते .... " My Favorite Family Members are Mummy, Papa, Aai, Baba and Rutu. I love all of them. They also love me a lot. ................................................"

खरंच निबंध चुकला?

Thursday, January 13, 2011

स्वागत !!!


आपण आयुष्य जगत रहातो पण काही क्षण वेचायचे राहतात का ?

याच क्षणांमधून तर आयुष्य समृद्ध होतं....  आपण खरेखुरे वाढतो.... 

मग यांनाच का विसरतो? 

असेच काही क्षण तुमच्याबरोबर मी पुन्हा एकदा जगणार आहे .. आणि तुम्हालाही जगायला लावणार आहे ... इथे .. माझ्या  बरोबर ... माझ्या जगात !!!!

या !!  तुमचे मनापासून स्वागत आहे !!!