Monday, January 17, 2011

खरंच निबंध चुकला?

रुणु तेव्हा दुसरीत होती. नेहमी तिचे पैकीच्या पैकी मार्क पहायची सवय झालेली मला. सहामाहीचा निकाल हातात आला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. इंग्लिश मध्ये एकदम आठ मार्क कमी!! 


झाले .. माझ्यातली कडक आई जागी झाली. वेगवेगळे प्रश्न विचारून मी त्या सात वर्षाच्या चिमुरडीला भंडावून सोडले. बिच्चारी .. तिला मला काहीही सांगता येत नव्हते. तिचे एकच उत्तर... मी सगळे बरोबर लिहिले आहे.. मला नाही माहिती काय झाले ते. शेवटी मी म्हटले पाहू या ओपन डे ला. पेपर पाहायला मिळतीलच ना. मग समजेल नक्की कशावर काम करायला हवे आहे ते. 


मी पुढचा पूर्ण प्लान हि तयार केलेला. कसा अभ्यास घ्यायचा.. किती वेळ खेळायला सोडायचे.. किती वेळ TV पाहून द्यायचा. चांगली शिस्त लावली पाहिजे. रोज भरपूर लिखाण करून घेतले पाहिजे. पुस्तके आणली पाहिजेत अवांतर अभ्यासासाठी. मी पूर्ण विसरले होते कि माझे पिल्लू फक्त सात वर्षाचे आहे. 

पाहता पाहता ओपन डे आला. मी शाळेत पोहोचले. पेपर हातात घेतला. पहिल्या पानावर सगळे बरोबर...... दुसऱ्या पानावर सगळे बरोबर...... तिसऱ्या  पानावरही तसेच. पानागणिक माझा आवेश कमी आणि उत्सुकता वाढू लागली. 

शेवटच्या पानावर..  निबंधात दहा पैकी दोन मार्क....  का?.... निबंध तर सुरेख लिहिलेला. पूर्ण दहा ओळि. मग काय चुकले ? मनातले प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेवून मी तिच्या टीचर कडे पहिले... आणि कसनुसे हसून त्या म्हणाल्या .... तो निबंध सुरेख आहे पण विषयाला धरून नाहीये म्हणून मार्क काटले. 

निबंधाचा विषय होता "My Favorite Family Member".. आणि रुणुनी लिहिले होते .... " My Favorite Family Members are Mummy, Papa, Aai, Baba and Rutu. I love all of them. They also love me a lot. ................................................"

खरंच निबंध चुकला?

No comments:

Post a Comment